मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असून, शिवसेना (उबाठा) पक्षात मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. दुसरीकडे, या फुटीवरुन बुधवारी सकाळी नवी दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या संभाव्य बंडखोर खासदारांवरटीका करताना संजय राऊत यांनी थेट आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. हा वाद वाढल्यानंतर संजय राऊत यांनी महाराष्ट्रात अशीच भाषा वापरली जाते असंही संजय राऊत म्हणाले.
बुधवारी दिल्लीत संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाच्या एकूण ९ लोकसभा खासदारांपैकी फक्त ३ खासदार उपस्थित होते. यामध्ये अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई यांचा समावेश होता. उर्वरित ६ खासदारांनी या पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवल्यामुळे, ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना आता दुजोरा मिळाला होता. याच दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आपला संयम गमावला.
गद्दारी त्यांच्या रक्तातच- संजय राऊत
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, "खासदार आणि आमदारकीची पदे येत-जात राहतात. आज आम्ही खासदार आहोत, उद्या कदाचित नसू. पण या पक्षाने आपल्याला काय दिले, हे आपण विसरू शकत नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हा सर्वांना मुलांसारखे सांभाळले आणि उद्धव ठाकरेंनी नेहमी भावासारखे प्रेम दिले. मग हे भो$%^& लोक कोण आहेत जे चाललेत."
राऊत यांनी थेट शिवीगाळ केल्यावर पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केले. तितक्यात अधिकच आक्रमक संजय राऊत यांनी, "नाही, हे कट करू नका हे असेच दाखवा. हे लोक बेईमान आहेत आणि बेईमानी त्यांच्या रक्तातच भिनली आहे. मी इथे कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाव घेत नाहीये," असं म्हटलं. नंतर या वादावर स्पष्टीकरण देताना त्यांनी, ज्याला जी भाषा कळते, त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते, असेही ठणकावून सांगितले.
"पैसे घेऊन पक्ष सोडणाऱ्यांवर काय बोलायचं"
"जो शब्द मी वापरला तो आमच्या मराठीत बोलला जातो. महाराष्ट्रात ही आमची रेग्युलर भाषा आहे. त्याच चुकीचे काय? ज्याला ज्या भाषेत कळतं त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं गेलं पाहिजे. कधी कुठली भाषा वापरली गेली पाहिजे हे मला माहिती आहे. मी संपादक आहे. मी संसदेत अशी भाषा वापरली नाही. कोणी बेईमानी केली तर तुम्ही काय करणार. पैसे घेऊन पक्ष सोडणाऱ्यांवर काय बोललं पाहिजे. त्यांच्यावर फुलं टाकायला हवी का," असा सवाल संजय राऊत यांनी केला.